बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुक्यात उटी बुद्रुक गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीने पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून तिचा निर्दयीपणे खून केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवन गजानन धुंदाळे (वय २८ वर्ष) असे आरोपी पतीचे नाव असून, त्याने त्याची पत्नी सौ. लक्ष्मी पवन धुंदाळे (वय २४ वर्ष) हिचा खून केला. ही घटना रविवार, दिनांक ०७ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

झोपेत असतानाच कुऱ्हाडीने केले वार..आरोपी पवन धुंदाळे याची पत्नी सौ. लक्ष्मी धुंदाळे ही घरी गाढ झोपेत असताना, पतीने अत्यंत क्रूरपणे तिच्या मानेवर कुऱ्हाडीचे घाव केले आणि तिचा जागीच खून केला.
अपमानास्पद बोलणे ठरले खुनाचे कारण.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक पत्नी सौ. लक्ष्मी ही आरोपी पती पवन याला नेहमीच अपमानास्पद बोलत असे. ती त्याला ‘तू काही कामाचा नाही, तू कुठेतरी जाऊन मर’ असे हिणवत असे. ०७ डिसेंबर २०२५, रविवार या दिवशीही मृतक पत्नीने आरोपीला याच शब्दांत अपमानित केले. या अपमानामुळे संतापलेल्या आरोपीने चिडून जाऊन, रात्रीच्या वेळी पत्नी गाढ झोपेत असताना घरात असलेली कुऱ्हाड घेतली आणि तिच्या मानेवर मागून वार करून तिचा खून केला.

गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू.. उटी बुद्रुक येथील पोलीस पाटील संदीप सदाशिव गटमणे यांनी या घटनेची माहिती दिल्यावर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यांच्या रिपोर्टवरून पोलीस ठाण्यात अप क्रमांक ५८०/२०२५, कलम १०३ (१) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या आदेशानुसार, या प्रकरणाचा पुढील तपास मपोउपनी स्नेहा शेडगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.