जळगाव जामोद तालुक्यातील..मूळचे सुनगाव येथील व सध्या पुणे येथे भारतातील प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व अध्यापकपैकी एक असलेले प्रा.अजिंक्यसिंह गोविंदसिंह राजपूत यांना यावर्षीचा ऐतिहासिक राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला.

इतिहास अभ्यास व अध्यापन क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी या पुरस्कारसाठी अजिंक्यसिंह यांना निवडण्यात आले. ते मागील दहा वर्षापासून पुणे ,दिल्ली ,ठाणे इत्यादी ठिकाणी ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना इतिहास शिकवत असतात. सोशल मीडियावर सुद्धा अजिंक्यसिंह यांना मोठा फॉलोवर वर्ग आहे.

अजिंक्यसिंह यांनी महाराष्ट्राच्या संस्कृती व इतिहासाचा वारसा त्याचप्रमाणे मराठ्यांचे पराक्रम याविषयी तथ्याधारित अभ्यास करून विद्यार्थ्यांसमोर मांडले, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम इतिहास व स्वराज याविषयी प्रेम जागवले, त्याचप्रमाणे गड किल्ल्यांचे संवर्धन व महत्त्व याविषयी जनजागृती केली. इतिहासाच्या माध्यमातून व्यक्तित्व विकास नेतृत्व गुण आणि राष्ट्रप्रेम यांचा प्रचार केला, त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा सातत्यपूर्ण प्रसार केला. या सर्व मूल्यांना व कार्याला गृहीत धरून प्रा.अजिंक्यसिंह यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.

सुनगाव सारख्या छोट्याशा गावातून येऊन इतका प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व जळगांव जामोद तालुका व अजिंक्यसिंह यांचे विद्यार्थी व मित्र गण यांच्यामधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या यशाचे श्रेय ते आपले गुरुजन व कुटुंबीयांना देतात.