न्यायदानाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कमिटीच्या निर्देशांनुसार सध्या डिजिटल क्रांतीचे पाऊल उचलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता जळगांव जामोद येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात e-Filing (ECT-7, ECT-12) संदर्भात विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश रोकडे यांनी ऑनलाइन पद्धतीने केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगांव जामोद न्यायालयाच्या न्यायाधीश मेंढे मॅडम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून वकील संघाचे अध्यक्ष ॲड. मो. इरफान उपस्थित होते.
भविष्यात होणारी ‘पेपरलेस कोर्ट’ कार्यवाही आणि इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेता, वकील मंडळींना तांत्रिक बाबींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या शिबिरात मास्टर ट्रेनर म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. करीम खान आणि ॲड. संदीप मानकर, तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर अक्षय निकाळजे यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणातील मुख्य विषय:
* e-Court Services: ऑनलाईन न्यायालयीन सेवांची व्याप्ती.
* e-Filing & Documents: कागदपत्रे स्कॅनिंग (Scanning), PDF निर्मिती आणि प्रोफाईल मेकिंग.
* तांत्रिक साधने: Kiosk मशीनचा वापर, GRAS (सरकारी महसूल), आणि ई-मेल (Gmail) चा वापर.
* पुरावे: इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचे (Electronic Evidence) सादरीकरण.
उच्च न्यायालय मुंबई, जिल्हा न्यायालय, ज्युडिशियल अकॅडमी आणि जळगांव जामोद वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. आनंद जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. स्वप्नील राजपूत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. मो. इरफान, सचिव ॲड. आनंद जोशी, उपाध्यक्ष ॲड. राहुल इंगळे, कार्यकारी अध्यक्ष दत्ता खेर्डेकर, तसेच न्यायालयाचे अधीक्षक श्री. शेळके साहेब व श्री. राजपूत साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रशिक्षण वर्गाला मोठ्या संख्येने वकील, त्यांचे लिपिक (कारकून) आणि टायपिस्ट उपस्थित होते.