सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये वाघ, अस्वल आणि इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव, उसरा, चालठाना आणि जामोद परिसरातील शेतीला रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांसह महावितरणला संयुक्त निवेदन देण्यात आले.

आज बुधवार, २१ जानेवारी रोजी देण्यात आलेल्या या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत, तहसीलदार पवन पाटील यांनी तत्काळ जळगाव जामोद, महावितरणचे उपअभियंता, यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. वन्यप्राण्यांचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याबाबत त्यांनी प्रशासकीय स्तरावर आवश्यक सूचना दिल्या आहेत.
निवेदनात नमूद केल्यानुसार, मागील तीन दिवसांपासून सुनगाव आणि चालठाना परिसरात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार दिसून आला आहे. विशेष म्हणजे, वनविभागाच्या ड्रोन सर्वेक्षणात या वाघाचे छायाचित्रही टिपले गेले आहे. तसेच, मागील आठवड्यात जामोद येथील शेतकरी रामेश्वर पुंजाजी हिस्सल यांच्यावर रात्री पिकाला पाणी देत असताना अस्वलाने हल्ला केला होता. संबंधित अस्वलासोबत पिल्ले असल्याने ते अधिक आक्रमक असून इतर शेतकऱ्यांसाठीही जीवघेणा धोका निर्माण झाला आहे.
सातपुडा पर्वताच्या सानिध्यात असलेल्या या गावांमध्ये रानडुकरे आणि तरसांचाही मोठा वावर आहे. अशा स्थितीत रात्री शेतात पिकाला पाणी द्यायला जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी दिवसा वीज पुरवठा त्वरित सुरू करावा. वीज पुरवठा दिवसा न केल्यास, रात्रीच्या वेळी होणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेला प्रशासन जबाबदार राहील. मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अश्याप्रकारे शेतकऱ्यांकडून निवेदनाद्वारे इशारा देत, मागणी केली गेली आहे.
यावेळी समाधान दामधर, शुभम उकरडा सोळंके, रमेश हागे, रवी बानाईत, शेषराव वंडाळे, पुंडलिक पाटील, दिनेश ढगे, अमोल भगत, सुभाष ढगे, विजय वंडाळे, गजानन सोनटक्के, विनोद इंगळे, गजानन दातीर, राजनकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.