सातारकरांची तहान भागवणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, गुरुवार शुक्रवार पासून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे सातारा शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कास तलाव परिसरात चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अखेर कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. या परिसरात पर्यटन वाढावे, या द़ृष्टिकोनातून सातारा नगरपालिकेने कासच्या सांडव्यावर चांगल्याप्रकारे टप्पे देऊन तेथे पाण्याला भुशी डॅमचा फील दिला आहे.
मात्र 19 ऑगस्ट पर्यंत पावसाळी पर्यटनाला जिल्हा प्रशासनाने बंदी आणल्यामुळे निसर्गाचा फुललेला हा सर्व विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांना 19 ऑगस्ट पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यावरच काही पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता कास परिसरात फिरायला जाणार्या पर्यटकांना कास नजीकचा सातार्याचा भुशी डॅम, भांबवली वजराई धबधबा, मुनावळेचा केदारेश्वर धबधबा, एकीवचा पाबळ धबधबा, बामणोली, शेंबडी, मुनावळे या पर्यटन स्थळी पावसाळी पर्यटनासाठी जाता येणार आहे. मात्र प्रशासनाचे परवानगी आणि प्रशासनाचे निर्बंध पाळावे लागणार आहेत. दरम्यान, कास तलाव भरल्याने आता सातारकरांची पाण्याची चिंता वर्षभरासाठी तरी मिटली असून, यामुळे सातारकरांनी सुस्कारा सोडला आहे.
