कल्याण रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई करत गुन्हे शाखा युनिट-3, लोहमार्ग, मुंबई आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने संयुक्तपणे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण 20.869 किलो वजनाचा गांजा आणि 4 लाख 17 हजार 360 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. नजीकच्या काळात पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले होते. त्याअंतर्गत 18 जून 2025 रोजी कल्याण युनिट-3 गुन्हे शाखा आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या संयुक्त पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली. दुपारी 3 वाजताच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 5 वर आलेल्या पुरी एक्सप्रेसमधून उतरलेल्या दोन इसमांकडे संशय आल्याने पोलिसांनी त्यांची झडती घेतली. मेहताब आलम इरशाद आलम शेख (वय 35) – मुंब्रा, ठाणे, लाल अहमद मो. अमीन कोटकी (वय 27) – कुलबर्गा, कर्नाटक अशी या दोन आरोपींची नाव असून त्यांच्याकडून मिळून आलेल्या बॅगांमध्ये तपासणी केली असता, एकूण 20.869 किलो वजनाचा गांजा सापडला. ही तस्करी उडीसा राज्यातील संबलपूर येथून करण्यात आली असल्याची कबुली त्यांनी दिली. दोघांवर NDPS कायदा 1985 अंतर्गत कलम 8(क), 20(ब)(ii)(क), 29 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
