जळगांव जामोद तालुक्यात, येत असलेल्या दादुलगाव येथे दिनांक २२ मे च्या दुपारी वडाच्या झाडाखाली बसलेल्या दोघांना एम.एच २८ बी.बी. २८६० क्रमांकाच्या टिप्परने उडवून दिले. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, काशीनाथ झालटे वय ४० वर्ष, व समाधान काळे वय ५५ वर्ष हे दोघेही हनुमान मंदीराच्या समोरील रोड लगत असलेल्या वडाच्या झाडाखाली बसलेले असतांना, मानेगाव वरून भरधाव वेगाने आलेल्या टिप्पर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वडाच्या झाडाखाली बसून असलेल्या दोघांनाही टिप्पर ची धडक लागून ते जखमी केले. यामध्ये काशीनाथ झालटे यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून, समाधान काळे हे सुध्दा जखमी झाले आहेत.अपघाताची माहिती वाऱ्यासारखी गावभर पसरली असता, गावातील संतप्त जमावाने सदर टिप्परला आग लावून पेटवून दिले. आगीत टीप्परचा पुढील भाग जळून खाक झाला. या अपघातातील जखमींवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी, जळगांव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ हे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल पोहचले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या अगोदर ही जळगांव जामोद तालुक्यातील माहुली फाटा येथे, भरधाव वेगाने येणाऱ्या गिट्टीच्या टिप्परने दोन बालकांसह एका वृद्ध महिलेला उडवून दिले होते. यामध्ये तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. ह्या घटनेला काही दिवस उलटत नाही तर लगेच परत, आज या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. यामध्ये या भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाचे लक्ष नसल्याचे नागरिक बोलताना दिसत आहेत. एकामागोमाग एक अश्या घडणाऱ्या ह्या घटना पाहता आता तरी पोलीस प्रशासन लोकांच्या जीवना-मरणाच्या ह्या प्रश्नाकडे लक्ष देवून बेदरकारपणे वाहन चालविणार्यावर कारवाई करतील अशी आशा सर्वसामान्यांना वाटत आहे.
