बुलढाणा जिल्ह्यात..मेहकर–लोणार तालुक्यात काल सायंकाळपासून ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पावसाची संततधार कायम आहेत. शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. अशातच डोणगाव मधून एक बातमी समोर आली असून 5 जण पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती आहे. शेलगाव देशमुख रोडवरील कास नदीपात्रात 5 जण अडकले आहेत. गोविंद परमाळे, आकाश परमाळे, कुलदीप परमाळे, अनिल परमाळे आणि ज्ञानेश्वर कऱ्हाळे अशी पुरात अडकलेल्यांची नावे आहेत. पाचही जण डोणगाव येथील राहणारे आहेत. सकाळी शेती कामासाठी ते नदीपात्राच्या पलीकडे गेले होते, मात्र आता पुराचे पाणी वाढले आहे. नदीपात्रात असलेल्या निंबाच्या झाडावर सध्या ते चढलेले असून त्यांच्या बचावासाठी बुलढाणा येथील बचाव पथक डोणगावकडे रवाना झाले आहे.
